मेथी लागवड

भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर दैनंदिन आहारात विविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेता येते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड करून जवळजवळ वर्षभर मेथीचे पीक घेता येते. या प्रस्तुत मेथी उत्पादन तंत्रज्ञान या लेखामध्ये आपणास मेथी या पालेभाजीची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येईल. मेथीचे महत्त्व व उपयोग जाणून घेता येईल. मेथीचे सुधारित पद्धतीची माहिती मिळेल.

मेथीचे महत्त्व व उपयोग

मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्यांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये तसेच भाजी करताना उपयोग करतात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मेथीची भाजी पाचक असून मेथीच्या भाजीमुळे यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते. मेथीमध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, इत्यादी खजिने तसेच ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

मेथी पिकास हवामान व जमीन कसे असावे?

मेथी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. विशेषत: कसुरी मेथीला थंड हवामान मानवते म्हणून हिवाळ्यातच या मेथीची लागवड करतात. मेथी हे कमी दिवसांत तयार होणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानांत मेथीचे पीक येत असले तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.

मेथीचे कोणते वाण वापरावे?

मेथी हे शेंगा कुळातील पीक असून मेथीचे कसुरी मेथी आणि नेहमीची मेथी असे दोन प्रकार आहेत.

1) कसुरी सिलेक्शन :

या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. या मेथीची फुले आकर्षक पिवळया रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात; तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेथीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) हा सुधारित वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केला असून तो 2 महिन्यांत तयार होतो. हा वाण उशिरा तयार होणारा असला तरी त्याचे अनेक खुडे घेता येतात आणि हा वाण परसबागेत लावल्यास फारच उपयुक्त आहे. बी तयार होण्यास 150 ते 160 दिवस लागतात.

2) पुसा अर्ली बंचिंग :

हा वाण लवकर वाढतो. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीची पाने लंबगोल किंवा गोलसर आणि मोठी असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानांच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात. या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. पुसा अर्ली बंचिंग ही सुधारित जात भारतीय कृषी संशोधन संस्था यांनी विकसित केली आहे. या मेथीची वाढ उभट व लवकर होते. पाने हिरवी असून 125 दिवसांत बी तयार होते.

3) मेथी नं. 47 :

महाराष्ट्रात मेथी नं. 47 हा सुधारित वाण विकसित करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी लुसलुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहणे ही या चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.

मेथी लागवडीचा कोणत्या हंगामात करावी?

मेथी हे थंड हवामानातील पीक असले तरी महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी हवामानात मेथीचे पीक घेतले जाते. मेथीची लागवड खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करतात. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी पेरणी टप्प्याटप्प्याने करतात. समशीतोष्ण हवामान आणि पाण्याचा नियमित पुरवठा असल्यास मेथीची लागवड वर्षभर करता येते. परंतु थंड हवामानात उत्पादन आणि पिकाचा दर्जा चांगला मिळतो.

मेथीचे बियाणे किती वापरावे?

नेहमीच्या मेथीचे हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते; तर कसुरी मेथीचे बी बारीक असल्याने हेक्टरी 20 किलोच बियाणे लागते. मेथीचे पीक दुसऱ्या पिकांत आंतरपीक म्हणून घेतल्यास त्यानुसार बियाणे कमी लागते. बियाणे पेरताना एकसारखे आणि विरळ पडेल याची दक्षता घ्यावी.

मेथी लागवडीस कोणती पद्धत वापरावी?

मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये 20-25 सेंटिमीटर अंतरावर ओळीतून पेरून किंवा बी फोकून करतात. आंतरपीक म्हणून मेथीचे पीक घेताना मुख्य पिकामधील मोकळ्या जागेत मेथीचे बी 20-25 सेंटिमीटर अंतरावर ओळीत पेरावे.

मेथीच्या लागवडीसाठी 3 X 2 मीटर आकाराचे किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात बी फोकून किंवा ओळीत पेरणी करतात. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्यास खुरपणी आणि तण काढणे सोपे होते. तसेच काढणी करणे सोपे जाते. नेहमीची मेथी पेरणीनंतर 3 – 4 दिवसांत उगवते तर कसुरी मेथीचा उगवण होण्यास 6 – 7 दिवस लागतात.

मेथी पिकास खत किती द्यावे?

मेथीच्या पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथीच्या पिकाला नत्रयुक्त खताची आवश्यकता असली तरी हे शेंगवर्गीय कुळातील पीक असल्यामुळे सुरुवातीला हेक्टरी 20 किलो नत्र आणि त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते किंवा पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लीटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे उत्पादन आणि प्रत सुधारते. पिकाचा खोडवा घेतल्यासही वरीलप्रमाणे खतांचा वापर करावा.

मेथी पिकास पाणी किती द्यावे?

मेथीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. कोवळी आणि लुसलुशीत भाजी मिळविण्यासाठी 4 – 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याचा नियमित पुरवठा केल्यास अधिक उत्पादन मिळून खोडवेही जास्त घेता येतात. या पिकाच्या सुरुवातीच्या काळात तण काढून पीक स्वच्छ ठेवावे.

मेथी पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोगांचे नियंत्रण कसे करावे?

मेथीवर मावा आणि पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) या किडींचा प्रादुर्भाव होतो. मावा कीड काळसर रंगाची असून पानांच्या खालच्या भागावर आणि शेंड्यांवर राहून मोठ्या प्रमाणात पानांमधील रस शोषून घेते. यामुळे रोपे निस्तेज होऊन मालाची प्रत खराब होते.

पाने पोखरणारी कीड पानांमधील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे जाते. त्यामुळे पानांवर पांढऱ्या रंगाच्या वेड्यावाकड्या ओळी दिसतात आणि मालाची प्रत खराब होते.

या किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून दर 8-10 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे. पीक काढणीच्या 8 दिवस आधी औषधे फवारू नयेत.

मेथीच्या पिकावर रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बियांची दाट पेरणी करू नये. पिकाला नियमित पाणी द्यावे आणि शेतात स्वच्छता राखावी.

मेथीची काढणी कधी करावी?

बी पेरल्यापासून 30-35 दिवसांनी मेथीचे पीक काढणीला तयार होते. मेथीची काढणी करताना संपूर्ण रोपटे मुळांपासून उपटून काढतात किंवा जमिनीलगत खुडून घेतात. मेथीच्या पिकाचा खोडवा 2-3 वेळा घेता येतो. कसुरी मेथीचे जास्त खोडवे घेता येतात. प्रामुख्याने हिवाळ्यात खोडवा घेणे शक्य होते. काही वेळा 2-3 खुडे घेतल्यावर पीक बियांसाठी ठेवतात. मेथीची पाने तजेलदार असताना आणि फुले येण्यापूर्वी काढणी करावी. काढणीच्या 2-3 दिवस आधी पाणी दिल्यास काढणी करणे सोपे जाते आणि पाने ताजी राहतात.

मेथीचे उत्पादन आणि विक्री कशी करावी?

मेथी काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून कापडात किंवा जाळीदार पिशव्यांमध्ये अथवा बांबूच्या टोपल्यांमध्ये जुड्या व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात. मेथीच्या जुड्या तुडवल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच काढणी संध्याकाळी करावी म्हणजे ताजी भाजी बाजारपेठेत पाठवता येते. मुळांना जास्त माती असल्यास मुळे पाण्यात धुऊन झटकून घ्यावीत, म्हणजे भाजी सडत नाही. मेथीची काढणी आणि विक्री ह्यांमध्ये कमीत कमी कालावधी असावा.

मेथीचे उत्पादन किती मिळते?

मेथीचे उत्पादन काढणीच्या पद्धतीनुसार दर हेक्टरी सरासरी 7-8 टन इतके मिळते. कसुरी मेथीचे उत्पादन दर हेक्टरी सरासरी 9 ते 10 टन इतके मिळते.

मेथीचे बीजोत्पादन कसे करावे?

मेथीचे पीक बियाण्यासाठी ठेवल्यास साध्या मेथीचे हेक्टरी 10 ते 15 क्विटल तर कसुरी मेथीचे हेक्टरी 6 ते 7 क्विटल एवढे बियाणे मिळते. बीजोत्पादनासाठी पेरणी 30 सेंमी. अंतरावर करावी. बीजोत्पादनास आक्टोबरनोव्हेंबर महिन्यात पेरणी करावी. बीजोत्पादनास पायाभूत बियाणे तयार करण्यासाठी दोन वाणांतील विलगीकरण अंतर 50 मीटर इतके असावे तर प्रमाणित बियाण्यासाठी 10 मीटर अंतर ठेवावे. 3 ते 4 वेळा पाहणी करून भेसळयुक्त रोपे उपटून काढावी. पीक तयार होऊन शेंगा पक्व होतात त्या वेळी काढणी करावी.

माती परीक्षण फायदे

जमीन ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. पीक उत्‍पादन वाढीसाठी तसेच जमिनीचे जडणघडण क्रिया, जमिनीतील उपलब्‍ध जीव-जंतू व जिवाणमुळे अनुकूल क्रिया घडून येत असतात. त्‍यामुळे पीक उत्‍पादन होण्‍यास मदत मिळते. जमिनीत पेरलेले बियाणे ते काही ठराविक अवधीत आंकुरण पावून दिसू लागते, अशा जमिनीतील नैसर्गिक क्रिया घडत असतात. म्‍हणून पीक उत्‍पादन, उत्‍पादकतकेसाठी जमीन आणि तिचे घटकाला अनन्‍यसाधारण महत्व आहे. अशा परिस्थितीत जमिनीचे स्‍वास्‍थ्‍य दीर्घकाळापर्यंत अबाधित ठेवणे अत्‍यंत जरूरीचे आहे.
शेती व्यवसायामध्ये सुपीक जमिनीस अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपणास शेतजमिनीबाबतची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पीक घेण्यापूर्वी पिकास कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे? जमिनीत पीक पोषकद्रव्याचा साठा कितपत आहे? जमिनीची जलधारणशक्ती आणि पोत कसा आहे? या बद्दलची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. यशस्वी शेती व्यवसायाचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणून पिकासाठी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
याच उद्देशाने पीक उत्पादनात जमिनीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जमिनीचे स्वास्थ्य सुपीक असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तुत लेख माती परीक्षणाचा मूलमंत्र आधारित आहे. सदर लेखाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माती परीक्षण, माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा नमुना कसा घ्यावा, माती परीक्षण घेताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षण तपासणीसाठी पाठवण्याचे विशेष बाबी, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची विस्तृत माहिती मिळणार आहे. माती परीक्षणानंतर जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्न्द्रव्यांची कमतरता अथवा त्याअनुषंगाने पीक उत्पादन वाढीसाठी खतांचा पुरवठा आणि एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल.
माती परीक्षण म्हणजे काय?
शेतातील मातीच्या नमुन्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेस माती परीक्षण असे म्हणतात.
माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची एक जलद पद्धती आहे, शेतजमिनीची पिकांना निरनिराळी अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची क्षमता काढणे, यालाच माती परीक्षण किंवा मृदा चाचणी असे म्हणतात.
माती परीक्षणाचे उद्देश
माती परीक्षणात पृष्ठभागावरील मातीचे नमुने घेऊन त्या मातीचा कस (सुपीकता) अजमाविला जातो. माती परीक्षणाचे उद्देश खालील प्रमाणे :
मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे.
रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात येते.
जमिनीची उत्पादनक्षमता समजते.
जमिनी क्षारयुक्त व खारवट याबाबत माहिती समजते.
रासायनिक खतांची मात्रा देता येते.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते.
माती परीक्षण महत्त्व
शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून तिची उत्पादनक्षमता वाढते.
योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते.
पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो.
उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो.
जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन क्षारयुक्त किंवा खारवट जमिनीबाबत माहिती घेता येते.
अन्नद्रव्यांचा अभाव असल्यामुळे पुढील योग्य त्या सुधारणा करता येते.
जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
मातीचा नमुना घेण्याची पद्धत
मातीचा नमुना हा शेतातील किंवा ठराविक क्षेत्रातील प्रातिनिधिक असावा. त्यासाठी शेतात गेल्यानंतर लगेच नमूना घेण्यास सुरुवात न करता प्रथम शेताची पूर्णपणे पाहणी करुन जमिनीचा रंग, उंच सखलपणा, हलकी, भारी, कोरडवाहू, सिंचनाची जमिनीचा खोली, पाण्याच्या निचऱ्याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त किंवा चोपण इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊ शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत.
खतांच्या शिफारशीसाठी मातीच्या नमुन्याची खोली किती असावी हे ठरविताना पिके जमिनीच्या कोणत्या थरातून अन्नद्रव्ये शोषण करुन घेतात हा मुद्दा विचारात घेतला जातो.
शेतातून मातीचा नमुना काढण्यासाठी साधारणत: फावडे, खुरपी, घमेली, बादली, अगर, सॉईल टयुब, गोणपाट, किंवा जाडकापड, पॉलिथीन किंवा कापडी पिशव्या इत्यादी वस्तूंची गरज भासते.
माती परीक्षणासाठी आपण फक्त अर्धा किलो मातीचा नमुना परिक्षणासाठी पाठवतो. म्हणून हा नमुना त्या शेतातील / विभागातील प्रतिनिधीक नमुना असावा लागतो. त्यासाठी प्रत्येक विभागातून साधारणपणे 12 ते 15 ठिकाणाहून नमुने घ्यावेत व त्यापासून एक प्रतिनिधिक नमुना तयार करावा.
एका विभागातील प्रतिनिधिक नमुना घेण्यासाठी त्या विभागातून सुमारे 12 ते 15 ठिकाणचे 15 ते 20 सें.मी. खोलीपर्यंतची माती गोळा करावी. खुरपी अथवा फावडे यांचा उपयोग करुन नमुना घ्यावयाचा असेल तर इंग्रजीतील व्ही (V) आकाराचा 15 ते 20 सें.मी. खोलीचा खड्डा करुन खड्डयाच्या एका बाजूला पृष्ठभागापासून खालपर्यंत सारख्या जाडीचा मातीचा थर घ्यावा. प्रत्येक ठिकाणाहून साधारणत: अर्धा किलो मातीचा नमुना स्वच्छ घमेल्यापर्यंत गोळा करावा.
प्रत्येक विभागातून साधारणपणे 12 ते 15 ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा केल्यानंतर ते स्वच्छ पोत्यावर किंवा ताडपत्रीवर पसरवावे. मातीसोबत आलेला काडीकचरा, दगड काढून ती चांगली मिसळून घ्यावी. नंतर मातीचा वर्तूळाकार ढिग करुन सारखे चार भाग करावे. समोरासमोरील कोणतेही दोन भाग घ्यावेत. हे दोन भाग आणखी एकत्र मिसळवून त्याचे परत चार भाग करावेत व समोरचे दोन भाग घ्यावेत असे शेवटी अंदाजे अर्धा किलो (500 ग्रॅम) माती मिळेपर्यंत करावे व तो प्रतिनिधिक नमुना म्हणून एका स्वच्छ कापडाच्या किंवा पॉलिथीनच्या पिशवीत भरावी. मातीचा नमुना आलेसर असेल तर प्रथम तो सावलीत सुकवावा व नंतरच पिशवीत भरावा. अशा तऱ्हेने प्रत्येक विभागातून मातीचा प्रतिनिधिक नमुना घेवून स्वच्छ पिशवीत भरावा व त्या विभागाचे नाव व इतर माहिती लेबलवर लिहून ते लेबल मातीचा नमुना असलेल्या पिशवीत ठेवावे व नमुने संबंधित माती परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावे.
मातीचा नमुना गोळा करताना घ्यावयाची खबरदारी
ज्या शेतातील मातीचा नमुना घ्यावयाचा आहे त्या पूर्ण शेतामध्ये फिरुन पाहणी करुन जमिनीचा विविध गुणाधर्मानुसार शेतीचे विभाग करुन प्रत्येक विभागातून एक प्रतिनिधिक नमुना घ्यावा.
मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे स्वच्छ असावीत. गंजलेल्या अवजारांनी नमुना घेऊ नये.
सर्व साधारणपणे मातीचा नमुना पीक काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.
शेतामध्ये पिके उभे असल्यास दोन ओळीतील जागेमधून मातीचा नमुना घ्यावा. रासायनिक खते दिली असल्यास दोन अडीच महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.
रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरु नयेत.
शेतामधील खते साठविण्यास व कचरा टाकण्याची जागा तसेच जनावरे बसण्याची जागा, शेतातील झाडाखालील जागा विहिरीजवळ, निवास स्थानाजवळ व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेवू नयेत.
पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर, वापसा असताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुना घेवू नये.
नमुन्यासह आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्याचे संपूर्ण नाव व पत्ता
जमीन सर्व्‍हे नंबर / गट नंबर
जमिनीचा प्रकार अ. बागायती ब. कोरडवाहू
जमीन बागायती असेल तर सिंचनाचे साधने (विहिर / ट्यूब वेल )
जमिनीची खोली (उथळ / मध्यम / खोल )
जमिनीची निचरा (कमी / मध्यम / चांगला)
जमिनीचा प्रकार (हलकी / मध्यम / सपाट)
जमिनीच्या समस्या (खारवट / चोपण / पाणथळ /चुनखळीयुक्त )
पूर्वीच्या हंगामात घेतलेली पिके, त्यांचे उत्पादन, वापरलेली खते व प्रमाण
नमुना घेतल्याची तारीख
माती परीक्षण निष्कर्ष
माती परीक्षण केल्यानंतर जमिनीत सामूनुसार वर्गवारी करण्यात येते. त्यानुसार आम्ल किंवा विम्ल निर्देशांक समजून घेता येतो. तसेच जमिनीची सुपीकता व उत्पादकतेचा सुद्धा अंदाज घेता येतो.
तक्ता क्र. 1 : माती परीक्षण केल्यानंतर जमिनीचा सामू आणि वर्गवारी
अ.क्र.
सामू
निष्कर्ष
1
4.5 पेक्षा कमी
अत्यंतिक आम्ल जमिन
2
4.6 ते 5.2
तीव्र आम्ल जमिन
3
5.3 ते 6.0
मध्यम आम्ल जमिन
4
6.1 ते 6.5
किंचित आम्ल जमिन
5
6.6 ते 7.0
उदासीन जमिन
6
7.1 ते 7.5
किंचित विम्ल जमिन
7
7.6 ते 8.3
मध्यम विम्ल जमिन
8
8.4 ते 9.0
तीव्र विम्ल जमिन
9
9.0 पेक्षा जास्त
अत्यंतिक विम्ल जमिन
माती परीक्षणासाठी शिफारशी
जमिनीची सुपीकता व उत्‍पादकता टिकवण्‍यासाठी माती परीक्षण करणे अत्‍यंत गरजेचे आहे.
माती परीक्षण करताना शास्‍त्रीय पद्धतीचे निकष व नियमांची पूर्तता काटेकोरपणे शेतकऱ्यांनी करणे अगत्‍याचे आहे.
मातीचा नमुना घेताना जनावरांचा गोठा, सेंद्रिय अथवा कंपोष्‍ट खत प्‍लॅंट व इतर ठिकाणच्‍या मातीचा नमुना शेतकऱ्यांनी घेण्‍यात येऊ नये.
पिकाच्‍या उत्‍पादन व उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक व सेंद्रिय खतांचे व्‍यवस्‍थापन करावे.
माती परीक्षण केल्‍यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची माहिती मिळणे सुलभ होते.
जमिनीत सूक्ष्‍मजीवजंतूचे संरक्षण करून जमिनीचे स्‍वास्‍थ्‍य अबाधित ठेवण्‍यात यावे, जेणेकरून उत्‍पादनात स्थिरता आणणे शक्‍य होईल.
माती परीक्षण अहवाल हा तज्‍ज्ञ व्‍यक्‍तींच्‍या सल्‍ल्‍यानुसार पुढील नियोजन आखावे.
माती परीक्षण हे दर दोन वर्षांनी करावे, जेणेकरून जमिनीतील उपलब्‍ध अन्‍नद्रव्‍ये माहित होण्‍यास मदत मिळेल.
माती परीक्षण केल्‍यामुळे जमिनीचा सामू व आम्‍ल-विम्‍ल निर्देशांक माहिती होऊन त्‍याचे पुढील पीक पद्धतीनुसार आयोजन करण्‍यात यावे.
माती परीक्षण करण्‍यासाठी जिल्‍हा किंवा तालुका माती परीक्षण केंद्रावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती घेऊन मातीचे परीक्षण करावे.
शेतकऱ्यांनी माती परीक्षणाबरोबरच पाणी परीक्षणसुद्धा करणे अत्‍यंत गरजेचे आहे.
माती परीक्षण अहवाल प्राप्‍त होताच पुढील हंगामातील घेण्‍यात येणाऱ्या पिकांचे व खतव्‍यवस्‍थापन करावे.
अशाप्रकारे माती परीक्षण, उद्देश, माती परीक्षण महत्त्व, माती परीक्षण नमुना घेण्याची पद्धत, माती परीक्षण नमुना घेताना घ्यावयाची दक्षता, मातीच्या नमुन्यासोबत द्यावयाची आवश्यक कागदपत्रे आदी बाबींचा संक्षिप्त आढावा प्रस्तुत लेखात लेखकांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माती परीक्षणानंतर जमिनीचा पोत, उत्पादनक्षमता, रासायनिक खतांची मात्रा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, हंगामनिहाय पीक लागवडीचे व्यवस्थापन करणे सुलभ होते आणि माती परीक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यस्थापन करून जमिनीचे स्वास्थ्य दीर्घकाळापर्यंत अबाधित ठेवता येते. त्यामुळे पीक उत्पादनात भरघोसपणे वाढ होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राखता येते.
प्रस्तुत माती परीक्षणाचा मूलमंत्र या लेखाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे माती परीक्षणांचे महत्त्व समजून घेता येईल. त्यानंतर मातीचे परीक्षण कसे करावे, माती परीक्षण घेताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे, माती परीक्षणासाठी माती नमुना पाठवावयाची याबाबत ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार असून शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढ होईल, अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल आणि त्यातून जमिनीचे स्वास्थ्य चांगले राखता येईल.

सेंद्रीय शेती काळाची गरज

शेती ही भारतीय लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. सध्या शेती क्षेत्रावरील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेतजमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे “सेंद्रिय शेती” पद्धतीचा अवलंब करणे होय.

वाचा- सेंद्रिय शेती काळाची गरज

भारत हा कृषिप्रधान अर्थव्‍यवस्था असलेला देश आहे. आज उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा अवलंब केला जात आहे यामुळे पिकांवर व मानवी आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. आज गरज आहे सेंद्रिय उत्पादनाची, मात्र त्यापेक्षा शेतातील पिकांची सेंद्रिय पद्धतीने कशी लागवड करता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात सेंद्रिय शेतीचा अवलंब कसा होईल त्यासाठी एकमेव पारंपरिक पद्धत म्हणजे सेंद्रिय शेती होय.

सेंद्रिय शेतीतून उत्पादने तयार होण्यास विशेष घटक म्हणजेच शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव, वाढता असंघटितपणा, वाढते तुकडीकरण, पावसाचे दिवसेंदिवस कमी होणारे प्रमाण आदी घटकांमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. अशा परिस्थिती कमीत कमी उत्पादन खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन होणे अत्‍यंत गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ‘सेंद्रिय शेती’ पद्धतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे.

वाचा- सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके


https://www.forbes.com
सेंद्रिय शेती का करायची ? Why do organic farming?

जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.
पाण्याची ५० % बचत होते .
सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
जमिनीची सुपीकता वाढते .
जमिनीचा पोत सुधरतो़
हवेतील ओलावा ओढून घेते.
नत्र उपलब्ध होते.
प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा ‘वेग वाढतो.
सजिवता वाढते .
पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
जमिनीत नविन घडण होते .
पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
आंतरकाष्टांगजन्य विघटन.
मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .
जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .
मातीची धूप थांबून पाणी जिरते.
आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
पिकांत साखरेचे प्रमाण, उत्पादन वाढवते.
पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते.
बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .
उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
जलधारणाशक्ती वाढते.
जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
खारे पाणी सुसह्य होते.
फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
जमिनीत शक्ती संतुलन बनते.
जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .
जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .
जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .
सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन पूर्वरत स्थितीत राहते.
प्रस्तुत लेखातील उपयुक्त माहितीचा आधार घेऊन शेतकरी जागा होईल. त्यांच्या शेती पद्धतीत बदल करण्यास मदत होईल. रसायनविरहित व दोषमुक्त उत्पादने घेता येतील. कमी खर्चात अधिक उत्पादन सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेता येईल. सेंद्रिय उत्पादनास हमीभाव तर मिळतो परंतु इतर उत्पादनाच्या बाजाराभावापेक्षा अधिकचा दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात स्थिरता आणता येईल व त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे सेंद्रिय शेती पद्धती आधारे शक्य होईल. म्हणूनच देशातील विशेषत: महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती करण्याकडे वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे.

सोयाबीन

सोयाबीन हे महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

 

सध्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची वाढ समाधानकारक झाल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी पिकांवर विविध रोगांची लागण झालेली दिसून येत आहे. यासाठी सोयाबीन पिकावरील रोगांची लक्षणे समजून घेता यावे, रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी हा लेख तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असल्यामुळे सोयाबीन पिकांवर हवामानातील अनुकूल वा प्रतिकूल बदलामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यामुळे अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावरील रोगांचे प्रभावी नियंत्रण केल्यास ते नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकावरील रोगांची माहिती व नियंत्रण याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
सोयाबीन पिकावरील प्रमुख रोग कॉलर रॉट (बुंधा कुज), मूळ व खोडसड, पिवळा मोझॉक विषाणू, तांबेरा, मोझॅक, शेंगावरील करपा, पानावरील जिवाणूचे ठिपके इत्यादी प्रमुख रोग आढळून येतात. या रोगाचे वेळेवर बंदोबस्त न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. परिणामी उत्पादन कमी मिळते. त्यासाठी सोयाबीन पिकावर आढळून येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख व नियंत्रण पुढीलप्रमाणे आहे.
1) कॉलर रॉट (बुंधा कुज) :
हा रोग ‘स्क्लेरोसीअम रॉल्फसी‘ या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पीक वाढीच्या काळात उष्ण व दमट हवामान या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. जमिनीलगत असलेल्या खोडाच्या खालच्या भागाला बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. तसेच बुरशीची पांढरी बिजेही आढळून येतात. त्यानंतर खोडाचा बुरशीग्रस्त भाग सडू लागतो, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त रोपे सुकू लागतात व मरून पडतात.
नियंत्रण :
पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा 1.5 ग्रॅम थायरम + 1.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. बुरशीजन्य रोपे उपटून शेताच्या बाहेर पुरून टाकावीत असे केल्याने रोगग्रस्त रोपाच्या बुरशी लगतच असलेल्या चांगल्या रोपापर्यंत जाण्यापासून बचाव होतो. रोगग्रस्त रोपे उपटलेल्या जागेवर कार्बेन्डॅझिम 2.5 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून स्प्रे पंपाचे नोझेल काढून आळवणी करावी, तसेच पिकाची फेरपालट करावी.
2) मूळ व खोडसड :
या रोगाची लागण रोपावस्थेपासूनच दिसून येते. रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची व मुळाची साल रोगग्रस्त झाल्याने रोपांना अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात व नंतर रोपे जमिनीलगत कोलमडून मरून जातात. जमिनीत कमी ओलावा तसेच 30 ते 35 अंश सें.ग्रे. जमिनीचे तापमान बुरशीच्या वाढीला अनुकूल आहे.
नियंत्रण :
बियाण्यास कार्बेन्डॅझिम 1.5 ग्रॅम + थायरम 1.5 ग्रॅम मिश्रण घेऊन प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी व नंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. जमिनीत निंबोळी पेंड किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत. पावसाचा खंड पडल्यास ओलाव्यासाठी पाणी द्यावे.
3) पिवळा मोझॉक विषाणू :
हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसतात.
नियंत्रण :
रोगप्रतिकारक/ सहनशील वाणांची पेरणी करावी, जसे की, जे. एस. 20-69, जे. एस. 20-29, जे.एस. 97-52 आणि जे.एस. 95-60. आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी असल्याचे आढळते. पिवळे चिकटे सापळे साधारणपणे 64 प्रति एकर प्रमाणे 15 x 30 सें.मी. आकाराचे सापळे उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत. पीक उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. उदा. थायमेथोक्झाम 25 डब्ल्यु.जी. 100 ग्रॅम किंवा इथोफिनप्रोक्स 1 लीटर प्रति हेक्टर 500 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
4) तांबेरा :
हा रोग बुरशीजन्य असून या रोगामुळे सुरुवातीला झाडाच्या पानाची खालची बाजू पिवळसर तांबूस ठिपक्यांनी दिसते व नंतर हेच ठिपके पानाच्या वरच्या बाजूवर आल्याचे दिसते. हा रोग हवेमार्फत पसरतो आणि काहीच अवधीमध्ये त्या परिसरातील सर्व पिकावर पसरतो. रोगाची तीव्रता जास्त असल्यास ही बुरशी पानाच्या देठावर पसरते त्यामळे मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात, आणि उत्पादनात 50 ते 80 टक्क्यापर्यंतची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.
नियंत्रण :
या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. उदा. फुले कल्याणी (डी. एस. 228), फुले अग्रणी (के. डी. एस. 344) व फुले संगम (के. डी. एस. 726). प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी लवकर म्हणजे 15 ते 25 मे च्या दरम्यान करावी त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पीक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोन्याझोल 25 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा हेक्झाकोन्याझोल 5 टक्के प्रवाही 10 मि.ली. 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
5) मोझॅक :
हा रोग सोयाबीन मोझॅक व्हायरस (पोटीव्हायरस) या विषाणूमुळे उद्भवतो. या रोगाचा प्रसार, मावा किडींद्वारे व बियाण्यापासून होतो. रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटलेली दिसते तर पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. रोगग्रस्त रोपांना फळधारणा कमी प्रमाणात होते व झाल्यास तेही खुरटलेलीच असतात.
नियंत्रण :
केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत आंतरप्रवाही पी. व्ही. ग्लायसिन्स या जिवाणूमुळे होते. हा रोग झाडाच्या पानांवर कीटकनाशकाची फवारणी व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे करावी.ठिपके दिसून येतात. ठिपक्यांच्या भोवती पिवळसर वलय दिसते.
6) शेंगावरील करपा :
हा रोग व ठिपक्यांचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात. हे जिवाणू ‘कोलेटोट्रिकम डेमाटीअम‘ या बुरशीमुळे होतो. या रोगास पॉड ब्लाईट असेही म्हणतात. यामध्ये विशिष्ट असा कोणताही आकार नसलेली व मोठे होत जाणारे लालसर अथवा गडद तपकिरी ठिपके पाने, खोड आणि शेंगावर दिसून येते. कालांतराने शेंगावर बुरशीचे काळे बिजाणू तयार होतात. अशा शेंगा तपकिरी /काळ्या पडतात व बी तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. ही बुरशी पानावर, खोडामध्ये तसेच शेंगामध्ये सुप्तावस्थेत राहते.
नियंत्रण :
पेरणीकरिता निरोगी उत्तम उगवणक्षमता असलेले बियाणे घ्यावे. पेरणीपूर्वी (कार्बेन्डॅझिम 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के) मिश्र घटक 75 टक्के डी.एस. ची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन 2.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास टेबुकोनाझोल 10 टक्के डब्ल्यू.पी. + सल्फर 5 टक्के + डब्ल्यू.पी. 25 ग्रॅम प्रति 10 लीटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
8) पानावरील जिवाणूचे ठिपके :
हा रोग ‘झानथोमोनास आक्झॉनोपॉडीस‘ इंडोस्किकार्ब पी.व्ही. ग्यायसीन्स या जिवाणूमुळे होतो. हा रोग झाडाच्या पानांवर व रोगांवर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते, या ठिपक्याचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात. हे जिवाणू पिकाच्या अवशेषात किंवा जमिनीवरील बियाण्यांत विश्रांती घेतात. या जिवाणूचे वहन वारा, पाण्याचे थेंब आणि किडींद्वारे होते. ते झाडाच्या नैसर्गिक छिद्रातून किंवा शेतकाम करताना झाडाला झालेल्या जखमांतून आत प्रवेश करतात.
नियंत्रण :
यजमान (होस्ट) नसणाऱ्या पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी. खत वापरात पालाश व स्फुरद असण्याची काळजी घ्यावी. पीक निघाल्यानंतर खोल नांगरणी तसेच झाडाचे सर्व अवशेष काढून जाळून टाकावे. रोगाचा प्रादुर्भाव आढल्यास कॉपर ॲक्झिक्लोराईड 30 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टीप : सदर लेखात नमूद केलेल्या कीटकनाशकाचे नाव, प्रमाण हे सोयाबीन रोगांसाठी शिफारशीत केलेले असून सदर औषधांचा वापर करताना तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन करावा. शासन वेळोवेळी कीटकनाशकावर बंदी घालत आहे.
सोयाबीन रोग नियंत्रणाचे फायदे :
पीक रोगमुक्त व सशक्त होते.
पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते.
रोगांचे प्रभावी नियंत्रण केल्यामुळे पुढील रोगांना आळा बसतो.
उत्पादनात वाढ होते.

प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर

सोयाबीन पिकावरील रोगांचे नियंत्रण हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.